Pune Ganesh Festival: पुण्यात बाप्पाच्या निरोपासाठी अलका चौकात भव्य रांगोळी ; अन्नभेसळीच्या राक्षसाची प्रतिकृती
Pune Ganesh Festival:

Pune Ganesh Festival: गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यातील अलका चौकात भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. मंडई ते अलका चौक या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आल्या असून, यंदा अन्नभेसळीविरोधात जनजागृती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामाजिक संदेश देणारी रांगोळी साकारली जाते. यंदा अन्नभेसळीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
रस्त्यावर अन्नभेसळीच्या राक्षसाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, विविध खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
या भव्य रांगोळीसाठी तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सराव केला. अन्नभेसळीचा राक्षस बाप्पाच्या पायाखाली तुडवला जावा, या संकल्पनेतून संपूर्ण रांगोळीची मांडणी करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांचे लक्ष ही रांगोळी वेधून घेत आहे. सामाजिक प्रश्नावर कलात्मक माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाची रांगोळी अजित पवारांना समर्पित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे सामाजिक संदेशासोबतच या रांगोळीची ही बाबही चर्चेचा विषय ठरली आहे.





