pune ganesh festival : मानाचे गणपती आगमन मिरवणूक उत्साहात ; विधीपूर्वक प्रतिष्ठापना
pune ganesh festival :

तुझ्या चरणी माझे असो नित्य ध्यान। तुझ्या कृपेने घडे आत्मज्ञान॥
सदा ठेव देवा कृपाछत्र माथा। तुझ्या भक्तिरंगी रंगू देहि आता॥
pune ganesh festival : अशा भावनेने भक्तिमय आणि मंत्रमुग्ध वातावरणात गणेशाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात मानाच्या पाचही गणपतींचे आगमन आणि प्रतिष्ठापना नियोजित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
सकाळी आठ वाजल्यापासून मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. वेगवेगळ्या वेळी या गणपतींची प्रतिष्ठापना झाली. दुपारी अडीचपर्यंत पाचही गणपतींची प्रतिष्ठापना पूर्ण झाली आणि भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. या पाचही गणपतींच्या प्रतिष्ठापनेचे तपशील असे…
मानाचा पहिला- श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ
मानाचा पहिला असलेल्या श्री कसबा गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी बरोबर सव्वाआठ वाजता सुरू झाली. मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या रास्ता पेठेतील कलानिकेतन वास्तूमधून ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पालखीत बाप्पांना विराजमान करून ही मिरवणूक ११ वाजून ४५ मिनिटांनी उत्सव मंडपात पोहोचली.
या मिरवणुकीत प्रभात बँड, संघर्ष ढोल-ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग, शौर्य ढोल-ताशा पथक आदी सहभागी झाले होते. वाराणसी येथील सांगवेद विद्यापीठात अत्यंत कठीण मानले जाणारे दंडक्रम पारायण यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केलेले १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली.
अत्यंत साधेपणा जपणाऱ्या या श्री कसबा गणेशोत्सव मंडळाने यंदाही सामाजिक संदेश देत पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणे, धर्म आणि प्रबोधन या दोन गोष्टी आपण सांभाळतो, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांनी दिली.
मानाचा दुसरा- श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ
मानाचा दुसरा असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी ठीक साडेनऊ वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लाॅज येथून सुरू झाली.
या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी झाले होते. ही मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपात पोहोचली आणि दुपारी १२.१५ वाजता श्रींची आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
यंदाच्या वर्षी मंडळातर्फे साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. प्रतिष्ठापनेनंतर भाविकांनी बाप्पांच्या आणि तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली.
मानाचा तिसरा – श्री गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ
मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशाची मिरवणूक सकाळी साडेअकरा वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिरापासून सुरू झाली. स्वप्निल आणि सुभाष सरपाले या बंधूंनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून ही मिरवणूक निघाली.
या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान, शिवतेज, शिवरुद्र, शिव ताल, रुद्रतेज, कलावंत ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. ही मिरवणूक मंदिरापासून गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौक, गुरुजी तालीम गणपती चौक उत्सव मंडपात दुपारी दोन वाजता आली. दुपारी अडीच वाजता उद्योजक पुनीत आणि जान्हवी बालन यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा चौथा – श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून सुरू झाली अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारा, तसेच स्वर्णाक्ष वीर आदिमया ओम् रुद्रांग त्रिताल पथके सहभागी होती.
लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर येथून गणपती चौक येथून मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. तेथे दुपारी साडेबारा वाजता तुळशीबाग बाप्पांची अयोध्या रामजन्मभूमी न्यासाचे कोषप्रमुख स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
या वेळी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित उपस्थित होते. याशिवाय परिसरातील व्यापारी आणि महिला सभासदही उपस्थित होत्या.
मानाचा पाचवा – केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सवाच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे गणराय पालखीमध्ये विराजमान झाले होते. श्रीराम ढोल-ताशा पथक, कलावंत ढोल-ताशा पथक आणि शार्पनर हे लहान मुलांचे ढोल-ताशा पथक यांच्यासह बिडवे बंधू याचा सनई आणि नगरा वादन होते.
मिरवणूक रमणबाग चौकातून शिंदेपार चौक, ओंकारेश्वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलीस चौकीमार्गे केळकर रस्त्याने केसरीवाड्यात दाखल झाली. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी रोनक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कौस्तुभ खळीकर यांनी पौराहित्य केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक आदी उपस्थित होते.





