Petrol Diesel Price Hike : युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज
Petrol Diesel Price Hike : इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम पुण्याच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना आगाऊ पैसे भरण्याचे निर्देश दिले

Petrol Diesel Price Hike : पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून, महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅसची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी शहरातील पेट्रोल पंपचालकांना संदेश पाठवून पेट्रोल आणि डिझेलसाठी आधीच पैसे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पेट्रोल पंपांना सात ते आठ दिवसांचे क्रेडिट दिले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत पैसे भरल्याशिवाय इंधनाचा पुरवठा होणार नसल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Petrol, diesel
दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे पुण्यातील गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गॅस, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे घरखर्च सांभाळणे कठीण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. काही ठिकाणी गॅस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. तर काही ठिकाणी गॅस ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
व्यावसायिक गॅस महागला (Petrol Diesel Price Hike)
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था करणे कठीण झाले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बंद (Petrol Diesel Price Hike)
गॅस टंचाईचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही दिसून येत आहे. सदाशिव पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या पाच दाहिन्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक लाकूड पद्धतीने करण्यात येत आहेत.





