पुणे : दिवाळीत भाऊबीजीच्या दिवशी दरवर्षी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभाग बंद असते. मात्र, यंदा रविवार (दि. ३ नोव्हेंबर) रोजी भाऊबीज आहे. शनिवारी (दि.२) बाजाराला साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे सलग दोन दिवस बाजार बंद राहू नये, यासाठी रविवारी भाऊबीजीच्या दिवशी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला आणि पान विभाग सुरूच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीस आणू शकतात. ग्राहक खरेदीस येऊ शकतात, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. या दिवशी मात्र केळी बाजार आणि मोशी उपबाजार बंद राहणार आहे. तसेच भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवार दि. ४) दरवर्षीप्रमाणे फुल बाजार बंद राहणार असल्याचेही बाजार समिती प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.