Pune: चार हजार किलो चिंध्या.. तर 9 हजार किलो फर्निचरचा कचरा संकलित

पुणे – शहरात नवरात्रोत्सव तसेच दिवाळी सणांसाठी नागरिकांकडून घराची स्वच्छता केली जाते. या स्वच्छतेत नको असलेले कपडे, गाद्या, उशा तसेच फर्निचर आणि आडगळीतील साहित्य नागरिक काढतात. मात्र, हे साहित्य कचऱ्यात देता येत नसल्याने ते शहरात जागा मिळेल तिथे टाकून देण्यात येत.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरात अशा कचऱ्यासाठी राबविलेल्या स्वच्छता मोहीमेत तब्बल 4 हजार किलो चिंध्या तर तब्बल 10 हजार किलो फर्निचर संकलीत करण्यात आले. महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुमारे 96 ठिकाणी हा कचरा देण्याची व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्याला, पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 19 टन टाकावू कचरा संकलीत करण्यात आला असल्याची असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. दरम्यान, यातील फर्निचर तसेच गाद्यांचा कचरा रिसायकलसाठी देण्यात येणार असून इतर कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
कोणत्या कचऱ्याचे किती झाले संकलन
– गाद्या – 4 हजार 168 किलो
– उशा – 701 किलो
– चिंध्या – 4 हजार 630 किलो
– फर्निचर – 9 हजार 188 किलो
– ई- कचरा – 260 किलो
एकूण – 18 हजार 947 किलो





