Pune : अंदाजपत्रकात आमदारांसाठी पायघड्या

पुणे – महापालिका निवडणुकीपूर्वी महापालिका आयुक्तांकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात शहरातील आमदारांना मतदारसंघाच्या विकासकामांसाठी आता महापालिकेकडूनही निधी दिला जाणार असून, त्यासाठी विकासकामांची यादी मागविण्यात आली आहे.
या कामांसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आमदार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काही आमदारांसह आयुक्तांची भेट घेतली आहे. या आमदारांना सरासरी २५ ते ३० कोटींची कामे सुचविण्यात येणार आहे. त्यासाठी आमदारांकडून प्रशासनास पत्रही देण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे रखडली आहेत. नगरसेवक असताना स्थानिक परिसरासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र वाॅर्डस्तरीय निधी देण्यात येत होता. मात्र, आता नगरसेवक नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांकडून सुचविण्यात आलेली कामे आहेत, त्यासाठीच निधी दिला जातो.
परिणामी अनेक कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने नागारिकांकडून महापालिकेच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते. पुढील काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर करण्यात येते.
त्यामुळे महापालिका आयुक्तांकडून नागरिकांसाठीची कामे आमदारांच्या माध्यमातून प्रस्तावित केली जाणार आहेत. शहरात आठ आमदार असून, त्यातील भाजप आमदारांकडून महापालिका प्रशासनाकडे विकासकामांची यादी सादर करण्यास सुरुवात केली जात आहे.





