पुणे – मालवाहतूक गाड्यांवर वाहतूक पोलीस करत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले, तसेच औषधांची वाहतूक करणाऱ्या गाड्या १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवणार असल्याचा इशारा दि पूना डिस्टीक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिला आहे. मध्यभागातील नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, तसेच मार्केट यार्डातील भुसार बाजारात अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात विविध रस्त्यावर जड वाहनांवर पोलिसांनी बंदी घातली आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरही कारवाई होत असल्याने वाहने बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनने सांगितले. याबाबत असोसिएशनची सभा नुकतीच झाली. व्यापारी संघटनांना पत्र याबाबत व्यापारी संघटनांना पत्र दिले आहे. गंभीर अपघातांमुळे दिवसा जड वाहनांवर निर्बंध आहेत. यामुळे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. निर्बंधातून जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना सूट देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, कृषी उपन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी केली आहे.