पुणे : दगडूशेठ गणपतीला ‘पुष्पनैवेद्य’

पुणे –श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त 50 लाख सुवासिक फुलांचा नैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला. मोगऱ्यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रूप पुणेकरांना पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थीनिमित्त कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्याकरीता भाविकांनी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. तसेच, गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन केले होते. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे केले.





