पुणे – गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त मंदिराची सजावट केली जाते. गुरुजणांना पुष्प भेट देण्याकडे भक्तांसह शिष्यांचा कल दिसून येतो. त्याअनुषंगाने मंगळवारी (दि. ८) मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून आले. बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत ती कमी तसेच त्यामध्ये दर्जेदार फुलांचे प्रमाणही कमी असल्याने फुलांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. येत्या गुरुवारी (दि. १०) गुरुपौर्णिमा आहे. यादिवशी, गुरुपूजन केले जाते. तर, कित्येक लोक दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतात. या काळात सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणार्या फुलांना जास्त मागणी असते. त्याअनुषंगाने शेतकरी माल राखून ठेवतात. त्यानुसार यंदाही मार्केट यार्डातील फूल बाजारात जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. बाजारात दाखल झालेल्या फुलांची शहर, उपनगरासह परगावाहून आलेल्या खरेदीदारांकडून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊन उलाढालही चांगली झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 9) याचप्रकारे आवक होऊन दर कायम राहण्याची शक्यता आहे. डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा यांसह विविध फुलांची खरेदी करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा परवा असून सद्यःस्थितीत दर्जेदार व टिकाऊ फुलांची खरेदी केली आहे. -सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड दर्जेदार मालाला मागणी जिल्ह्यासह पुणे विभागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भिजलेल्या आणि दर्जाहीन मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, ग्राहकांकडून दर्जेदार आणि सुक्या मालाला मागणी आहे. दर्जेदार मालाला अधिक भाव मिळत आहे. फूल बाजारातील दर्जेदार फुलांचे दर पुढीलप्रमाणे फुले घाऊक दर (प्रतिकिलो) झेंडू 60 ते 80 रुपये शेवंती 150 ते 200 रुपये गुलछडी 150 ते 200 रुपये जुई 500 ते 600 रुपये साधा गुलाब 30 ते 40 रुपये (गड्डी) डच गुलाब 150 ते 160 रुपये (20 नग)