Pune: बोपदेव घाट अत्याचारातील तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाची ‘मनोधैर्य’अंतर्गत मदत; 5 लाखाची नुकसान भरपाई

पुणे – कोयत्याच्या धाक दाखवत बोपदेव घाटात सामुहिक अत्याचार करण्यात आलेल्या तरुणीला ‘मनोर्धेय’ योजनेंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. तरुणीने ११ ऑक्टोबर अर्ज केला होता. तो १९ ऑक्टोबरला नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयासह विधी सेवा प्राधिकरणाने मंजुर करत तरुणीला दिलासा दिला आहे. अर्ज केल्यानंतर तो केवळ नऊ दिवसांत मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
कोंढव्यातील टेबल पॉइंट परिसरात तीन ऑक्टोबरला रात्री तरुणीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले असता तरुणी आणि तिच्या मित्राला आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवीत हा प्रकार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून तरुणीने प्राधिकरणात अर्ज केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्राधिकरणाने त्वरित अर्जाची पडताळणी करत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यातील २५ टक्के रक्कम तरुणीला रोख स्वरूपात देण्यात येईल. तर ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी तिच्या नावे बॅंकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्यातून येणाऱ्या व्याजातून ती पुढील उपचार घेऊ शकते. तसेच दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तिला यातून मदत होणार आहे.





