Pune : अंतिम सत्रातील उमेदवारांनाही टेट परीक्षेसाठी संधी

पुणे : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस (टेट) होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार टेटसाठी पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारदेखील टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहणार आहे.
टेट परीक्षेसाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी टेट परीक्षा देता यावी, यासाठी मागणी वारंवार केली आहे. सन २०१७ मध्ये अशा प्रकारची पहिली व सन २०२२ मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०२५ मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास ५ वर्षे व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास ३ वर्षे इतके अंतर आहे.
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर टेटसाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता टेटबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.
शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारदेखील टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहणार आहे.
टेटमध्ये त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास टेटच्या गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे. तरतूद सन २०२५ मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व टेट परीक्षांना ही तरतूद लागू राहणार आहे.





