Top 10 News : बारामती-राहुरी पोटनिवडणूक जाहीर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलाय. त्याचबरॊबर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राहुरी मतदारसंघ शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त झाला, तर बारामतीची जागा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालीय. या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान तर 4 मेला मतमोजणी होणार असून या पोटनिवडणुकांकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलंय. 2) वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार नागपूरमध्ये सोलर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीजदरांबाबत मोठी घोषणा केलीय. २०२५ ते २०३० या कालावधीत दरवर्षी वीजदर १.२ टक्क्यांनी कमी केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे २०३० पर्यंत घरगुती वीजदरात सुमारे २६ टक्के तर औद्योगिक वीजदरात ९ टक्के घट होण्याची शक्यता आहे. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत होते, असंही त्यांनी नमूद केलंय. नागपूरमधील अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात सोलर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. अपारंपरिक ऊर्जेकडे देश वेगाने वळत असल्याचे सांगत, राज्यातील शेतकऱ्यांसाठी १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. 3) लाडक्या बहिणींना मोठं सरप्राईज राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलीय. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या काही महिन्यांपासून हप्ते मिळण्यात उशीर झाला होता. आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली असून दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद करत योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलंय. 4) धाराशिवमध्ये भीषण अपघात धाराशिव जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झालेत. करजखेडा पाटीजवळ हा अपघात घडलाय. बोलेरो गाडी अतिवेगात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरोने प्रथम वॅगनारला धडक दिली. त्यानंतर गाडी पलटी होऊन दुभाजक ओलांडत समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारवर आदळली. या तिहेरी धडकेत तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींना उपचारासाठी धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 5) तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि अभिनेता विजय यांचा पक्ष T टीव्हीके यांच्यात युतीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीय. युती झाल्यास विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. जागावाटपात टीव्हीकेला सुमारे ८० जागा देण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगितले जातेय. मात्र विजय मुख्यमंत्रीपदावर दावा करत असल्याने वाटाघाटींमध्ये अडथळे येत असल्याची चर्चाय. दरम्यान, भाजप नेते के आण्णामलाई यांनी एनडीएला तामिळनाडूमध्ये जिंकण्यासाठी इतर पक्षांची गरज नसल्याचे सांगितलंय. तसेच पंतप्रधान मोदी निवडणुकीपूर्वी आणखी दौरे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 6) पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलाय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केलीय. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होईल, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्व राज्यांची मतमोजणी ४ मे रोजी केली जाणार आहे. या निवडणुकांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे आणि २.५ कोटी अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केले जाणार आहेत. 7) कर्नाटकमध्ये भीषण अपघात चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यात भीषण अपघात घडलाय. कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने तीन पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार पाच पोलीस अधिकारी बेंगळुरू येथून बल्लारी येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान होसदुर्गा तालुक्यातील हेगेरेजवळ कार थांबलेल्या ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की मंजुनाथ, अंबरीश आणि सचिन या तीन आरएसआय अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एसआय ईश्वर आणि आरएसआय महांतेश गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिरात हळहळ व्यक्त केली जातेय 8) इराणचा नेतान्याहूंना इशारा मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा इस्रायल सरकारने फेटाळून लावल्यात. पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले की नेतान्याहू पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या मृत्यूच्या बातम्या निराधार आहेत. दरम्यान, एका कथित एआय-निर्मित व्हिडिओमुळे संभ्रम निर्माण झाला होता. या व्हिडिओमध्ये नेतान्याहू पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिसत होते. मात्र काही सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या हाताला सहा बोटे दिसल्याचा दावा करत हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे म्हटले. या अफवांदरम्यान इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आलीय. आमच्या मुलांना मारणारा जिवंत असेल तर त्याला सोडणार नाही, असा इशारा देत इराणने इस्रायलला लक्ष्य केलंय. 9) रणवीर सिंगचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ वादाच्या भोवऱ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलाय. १९ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आर माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेल्या शीख व्यक्तीच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात आहे. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विक्की थॉमस सिंग यांनीकेंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. शीख धर्मात धूम्रपान निषिद्ध असताना चित्रपटात शीख पेहरावात असलेल्या पात्राला धूम्रपान करताना दाखवले असल्याचा आरोप करण्यात आलाय. या दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत चित्रपटातील संबंधित दृश्ये हटवण्याची आणि शीख समुदायाची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आलीय. १० ) दहा संघांचे ‘कॅप्टन्स’ फायनल २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ साठी सर्व १० संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा हार्दिक पंड्या सांभाळणार आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल. सर्वात मोठी बातमी म्हणजे, आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देणारा रजत पाटीदार यंदाही कर्णधार असेल. राजस्थान रॉयल्सने युवा रियान परागवर विश्वास दाखवला आहे, तर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करेल. कोलकाताची कमान अजिंक्य रहाणेकडे, तर पंजाबची धुरा श्रेयस अय्यरकडे असेल.