Pune : पुणे महापालिकेची पावणे पाचशे वाहने भंगारात

Pune : केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठीचे धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार आता पुणे महापालिकेच्या ताफ्यातील पावणे पाचशे वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने वापरविना पडून असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या लिलावाची प्रक्रिया अॅानलाईन पद्धतीने केली जाणार आहे.
महापालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या ताफ्यातील पावणे पाचशे वाहनांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे ही वाहने वापरणे शक्य नसल्याने या वाहनांचा महापालिका लिलाव करणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने राज्य सरकारच्या एमएसटीसी या संकेतस्थळावर लिलाव होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी माहिती दिली.
महापालिकेकडे सध्या एकूण १,१६३ वाहने असून त्यामध्ये अधिकाऱ्यांची वाहने, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, विद्युत, उद्यान, आकाश चिन्ह, मलनिःसारण यासह आदी विभागांमध्ये वाहनांचा वापर केला जातो. या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी धोरण लागू केले आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आरटीओ नोंदणी करून केली जात आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ४७३ वाहने सेवेतून बाद केली असून, यातील काही वाहने २४ ते १५ वर्षे जुन्या होत्या.





