Pune : कर विभागात बदलीसाठी फिल्डींग; विनंती बदलीसाठी आमदारांची शिफारसपत्र

पुणे – अवघ्या एक ते दीड वर्षांपूर्वी मिळकतकर विभागातून दुसऱ्या विभागात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा याच विभागात येण्यासाठी महापालिका प्रशासनावर थेट राजकीय दबाव आणला जात आहे. बदली झालेल्या ठिकाणी काम करणे शक्य नसल्याच्या अडचणींची गाऱ्हाणी मांडत पुन्हा याच विभागात बदलीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मिळकतकर विभागासाठी जवळपास २५ ते ३० जणांनी अर्ज केले असून त्यासाठी आमदार, खासदारांसह महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांचे शिफारसपत्र जोडण्यात आले आहे. त्यामुळे, कर संकलन विभागातच या कर्मचाऱ्यांना रस का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर संकलन विभागासोबतच बांधकाम विभागातही परतण्यासाठी अनेकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच फिल्डींग लावण्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, शिक्षण विभाग, कर संकलन विभाग, बांधकाम विभागात अनेकांची मक्तेदारी निर्माण झाली होती. त्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नियमानुसार बदल्या करण्य़ात येत आहेत.
मात्र, कर संकलन विभागातून बदली झालेले कर्मचारी पुन्हा याच विभागात येण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी एकत्र आलेल्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी एक यादीच केली असून या यादीबाबत सामान्य प्रशासन विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर बदलीसाठी थेट आमदारांचाही शिफारसपत्रे काही कर्मचाऱ्यांनी आणली आहेत.





