Maha Dirt Track : पुण्यात ‘महा डर्टट्रॅक चॅलेंज २०२६’ स्पर्धेला तुफान प्रतिसाद; गोळीबार मैदानात रंगली देशातील पहिली राज्यस्तरीय बाईक रेस
Maha Dirt Track : पुणे फेस्टिवल अंतर्गत, एक्स्ट्रीम रेसिंग अँड मोटर्स स्पोर्ट्स आणि रॉयल रोडिओ आयोजित स्पर्धेमध्ये गोळीबार मैदान येथे दुचाकी वाहनांची चित्त थरारक झुंज पाहायला मिळाली.

Pune Festival 2026 Maha Dirt Track Challenge First Round Concludes In Pune : पुणे फेस्टिव्हल २०२६ च्या अंतर्गत ‘एक्स्ट्रीम रेसिंग अँड मोटर स्पोर्ट्स’ आणि ‘रॉयल रोडिओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “महा डर्टट्रॅक चॅलेंज २०२६” ही चित्तथरारक दुचाकी रेसिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १९ आणि २० सप्टेंबर रोजी पुण्यातील मध्यवर्ती गोळीबार मैदानावर रंगलेल्या या थराराला पुणेकरांनी अभूतपूर्व गर्दी करत डोक्यावर घेतले. देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय रेसिंग मालिकेच्या पहिल्या फेरीत रायडर्सनी केलेल्या साहसी कसरतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
भारतातील पहिली राज्यस्तरीय रेसिंग स्पर्धा; गोव्यात रंगणार महाअंतिम फेरी!
भारतात आतापर्यंत केवळ स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धाच होत होत्या; मात्र राष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी रायडर्सना व्यासपीठ मिळावे म्हणून ही पहिली राज्यस्तरीय मालिका सुरू केल्याचे संस्थापक शीतल राठोड यांनी सांगितले. ही मालिका एकूण पाच फेऱ्यांची असून पुण्याच्या पहिल्या फेरीनंतर पुढील तीन फेऱ्या नाशिक, मुंबई आणि कोल्हापूर येथे पार पडतील. तर ५ वा महाअंतिम राऊंड गोव्यात रंगणार असून पाचही फेऱ्यांतील एकत्रित गुणांच्या आधारे राज्यस्तरीय विजेता ठरणार असल्याचे ८ वेळा राष्ट्रीय विजेते पिंकेश ठक्कर आणि जयदीप पवार यांनी स्पष्ट केले.
१५ गटांतील अटीतटीचा थरार; सार्थक, जिनेन्द्र अन् अतीकाची बाजी!
स्पर्धेत एकूण १५ विविध गटांत चुरस पाहायला मिळाली. ‘प्रो फॉरेन’ आणि ‘प्रायव्हेट फॉरेन’ प्रकारात सार्थक चव्हाणने प्रथम क्रमांक पटकावला, तर जिनेन्द्र सांगावे दुसऱ्या स्थानी राहिला. जिनेन्द्रने ‘४ स्ट्रोक एक्सपर्ट’ आणि ‘इंडियन प्रो एक्सपर्ट’मध्ये अव्वल स्थान पटकावले. महिलांच्या ‘क्वीन्स ऑन बाईक्स’ प्रकारात अतीका सुरियाने बाजी मारली. तसेच किड्स फॉरेनमध्ये फैज सय्यद, स्टार ऑफ द सिटीमध्ये लोकेश भोसले आणि रॉयल एनफिल्ड ओपनमध्ये आदित्य सामंत विजेते ठरले.
पुणे फेस्टिव्हल अध्यक्षांकडून गौरव; मान्यवरांची उपस्थिती!
या स्पर्धेमुळे नवोदित रायडर्स राष्ट्रीय पातळीसाठी सक्षम होतील, असा विश्वास पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केला. या वेळी मुख्य प्रशासकीय समन्वयक अभय छाजेड, प्रसन्न गोखले, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, डॉ. राजन संचेती आणि मनोज भोर आदी मान्यवर उपस्थित होते. आरटीओ आणि आयोजकांच्या चोख नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली.





