Sakshi Choudhary Boxing : पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकविजेतीला थेट ५-० ने लोळवले! भारताच्या साक्षी चौधरीचा रिंगमध्ये थरार; पदार्पणातच मोठा उलटफेर
Sakshi Choudhary Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरीने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आयरा विलेगासला ५-० ने पराभूत करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

Asian Games 2026 Sakshi Choudhary Beats Paris Olympic Bronze Medalist Aira Villegas : कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती भारताची युवा स्टार बॉक्सर साक्षी चौधरीने (Sakshi Choudhary) मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे. पहिल्याच पदार्पणाच्या लढतीत साक्षीने पॅरिस ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती फिलिपिन्सची दिग्गज बॉक्सर आयरा विलेगासवर ५-० ने एकतर्फी मात करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. तिच्या या आक्रमक सुरुवातीमुळे बॉक्सिंगमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.
तिन्ही फेऱ्यांत १०-९ ने बाजी; तिन्ही पंचांचा साक्षीच्या बाजूने कौल!
निशिओ जिम्नॅशियममध्ये रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत साक्षीने सुरुवातीपासूनच अचूक पंचेस आणि अप्रतिम कामगिरी करत सामन्यावर नियंत्रण राखले. तिने प्रतिस्पर्धी विलेगासला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि तिन्ही फेऱ्या १०-९ अशा समान स्कोअरने जिंकल्या. सर्व पंचांनी साक्षीच्या बाजूने एकमुखाने निकाल देत ५-० असा विजय घोषित केला. आता गुरुवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत साक्षीचा सामना ५१ किलो वजनी गटातील विद्यमान जागतिक चॅम्पियन अलुआ बाल्किबेकोव्हाशी होणार आहे.
निकहत आणि मीनाक्षीला नमवून संघात मिळवले होते स्थान!
🔥 WHAT A FIGHT FROM SAKSHI CHAUDHARY!
Watch Sakshi dominate the Paris Olympic bronze medallist 5-0 and storm into the Asian Games pre-quarterfinals! 💥pic.twitter.com/7S3O5TONeC
— Sports Apna 🇮🇳 (@sportsapna1) September 22, 2026
साक्षीने याआधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या निवड चाचणीत तिने दोन वेळची जगज्जेती निकहत झरीनचा उपांत्य फेरीत, तर अंतिम फेरीत विद्यमान विश्वविजेती मीनाक्षी हुड्डाचा पराभव करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर कॉमनवेल्थच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या रुबी व्हाईटला ५-० ने नमवून तिने सुवर्णपदक पटकावले होते.
‘देशाचे प्रतिनिधित्व करणे हीच ताकद’; सुवर्णपदकावर नजर!
कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर साक्षीने आशियाई क्रीडा स्पर्धा हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते. विजयानंतर बोलताना ती म्हणाली, “भारताचे प्रतिनिधित्व करणे हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. देशासाठी खेळताना मिळणारी ऊर्जा मला प्रत्येक लढतीत आधीपेक्षा सरस कामगिरी करण्याचे बळ देते.” आता जागतिक चॅम्पियनविरुद्धच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





