Pune: कात्रज घाट रस्त्यावर जीवघेणा खड्डा

कात्रज – कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मांगडेवाडी नजीक हॉटेल महाबळेश्वर समोर बांधकाम विभागाकडून ड्रेनेज लाईन व सांडपाणी वाहिनीसाठी पावसाळ्यातच खोदकाम केले आहे. या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पादचारी तसेच वाहन चालकांचा जीव धोक्यात आहे.
कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मांगडेवाडी नजीक हॉटेल महाबळेश्वर समोरील रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आलेला खड्डा दोन दिवसांपासून उघडा आहे. येथून सुंधामाता नगरकडे जाणारा रस्ता देखील बंद झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिक गेल्या दोन दिवसांपासून हैराण झाले आहेत. या खोदलेल्या खड्ड्याकडेने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा पट्ट्या अथवा बॅरिकेट्स लावण्यात आलेले नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका आहे.
कात्रज घाटाकडे जाणारा हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यातच पावसाळी दिवस असल्याने रस्त्याच्या बाजूचे खड्डे दिसत नाहीत. हा चार ते पाच फुटाचा खंदण्यात आलेला रस्ता धोकदायक ठरू लागला आहे.
रस्त्याच्या बाजूने खोदलेला खड्डा तातडीनने बुजविण्यात यावा, अन्यथा त्या ठिकाणी बॅरिकेट्स व इतर सुरक्षा विषयी उपाययोजना करावी. अशी मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.





