वन विभाग; एआय तंत्रज्ञान वापरून केली फसवणूक पुणे – जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे एका शेतात वाघ दिसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तेथील नागरिक भयभीत झाले. मात्र, हा फोटो एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आला असून, तो फेक असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यामुळे अशा प्रकारच्या फोटोंवर आणि वाघ आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वन खात्याच्या जुन्नर विभागाने केले आहे. वन विभागाच्या निदर्शनास आले आहे, की मंगरूळमध्ये शेतात वाघ दिसल्याचा एक फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. चौकशी केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि ही प्रतिमा शेअर करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. मंगरूळ येथील दत्तात्रय विनायक मिंडे यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. वाघाचे हे छायाचित्र खरे नसून ते एआयच्या सहाय्याने बनवल्याचे मिंडे यांनी वन विभागाला लिहून दिले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा पसरवू नये आणि अशा कोणत्याही माहितीची सत्यता पुढे शेअर करण्यापूर्वी पडताळून पाहावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. पडताळणी न केलेली माहिती पसरवल्याने सामाजिक सौहार्द बिघडू शकते आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, असे या आवाहन पत्रात म्हटले आहे.