Pune: दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर सुविधा

पुणे – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही सशक्त करण्याच्या उद्देशाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.
या विधानसभा मतदार संघात इआरओ नेट सॉफ्टवेअर नुसार २ हजार २५९ अस्थिव्यंग १४३ कर्णबधिर, २१८ अल्पदृष्टी व २ हजार ४८० इतर असे एकूण ५ हजार १०० दिव्यांग मतदार आहेत. तसेच वय वर्ष ८५ वरील एकूण १० हजार ३११ मतदार आहेत. यामध्ये १०० वर्ष वरील एकूण २२६ मतदार आहेत.
कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर्सची सुविधा, मतदान केंद्रावर व्हीलचेअर साठी रॅम्प, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक, दुभाषक आदी व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाही बळकटी करणेकामी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.





