Pune: दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण; त्या स्कूल व्हॅन चालकाच्या कोठडीत वाढ

पुणे – सहा वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाची अधिक चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश ( पॉक्सो) बी.पी. क्षीरसागर यांनी आरोपीला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शाळेत ने-आण करण्यासाठी लावलेल्या स्कूल व्हॅन चालकानेच चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक करून न्यायालयात हजर केले. तत्पूर्वी जमावाने शाळेची व्हॅन तोडफाेड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपीला न्यायालयात आणताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी न्यायालयात सांगितले की, हा आरोपीने मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत.
या दोन्ही मुली दहा वर्षांच्या आतील असल्याने या प्रकरणात “पॉक्सो’ कायद्यातील कलम ६ देखील लागू होते. तसेच मुलींचा जबाब घेण्यात येणार आहे. जबाबामध्ये आणखी काही वेगळी परिस्थिती समोर येऊ शकते. या मुलींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य पाहून न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.





