पुणे : 5 हजार अस्थायी पदांना मुदतवाढ; शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिलासा

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 5 हजार 279 अस्थायी पदांना शासनाने येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतील अस्थायी पदांना 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ती संपल्याने शिक्षण आयुक्तांनी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंजूरी मिळाली.
अस्थायी पदांवर पूर्वी ज्या लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात येत होता त्याच लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात यावा. हा खर्च मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा, असे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी आदेशात नमूद केले आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागासाठी एकूण 7 हजार 131 पदे असून यात 1 हजार 852 स्थायी पदे आहेत. उर्वरित पदे अस्थायी स्वरुपाची आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालयाअंतर्गत 640 पदे आहेत. यात 234 स्थायी, तर 406 अस्थायी आहेत.
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांसाठी 6 हजार 284 पदे आहेत. यात 1 हजार 537 स्थायी, तर 4 हजार 747 अस्थायी पदांचा समावेश आहे. लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीमधून खर्च न होणारी एकूण 207 पदे आहेत. यात 81 स्थायी व 126 अस्थायी पदांचा समावेश आहे.





