Pune: गर्दीमुळे उत्कंठा शिगेला

पुणे – शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. मतदानासाठी सकाळ व सायंकाळच्या वेळी मतदारांच्या रांगा रांगल्या होत्या. सहकारनगर येथील विद्या विकास स्कूलमध्ये असलेल्या मतदान क्रमांक १९८ येथे खोली क्रमांक तीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम बदलावे लागले. तर, कोणताही अनुसूचित प्रकार न घडता या मतदारसंघात मतदान शांततेत झाले.
पर्वती मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत तब्बल नऊ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५.९१ टक्के इतके मतदान झाले होते. सकाळपासून मतदारांचा असणारा उत्साह दुपारपर्यंत होता.
दुपारी एक वाजेपर्यंत २७.१९ टक्के मतदान झाले. दुपारी एक ते तीन वाजण्यादरम्यान मतदानाचा उत्साह कमी होईल असा अंदाज होता. मात्र या दोन तासांच्या दरम्यान १० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यत एकूण मतदान हे ३७.६६ टक्के इतके झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४८.६५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.
पर्वती मतदारसंघात सहकारनगर, पर्वती, पर्वती दर्शन, जनता वसाहत, पु.ल.देशपांडे उद्यानाचा काही भाग, महर्षीनगर, गुलटेकडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, चव्हाणनगर, सॅलीसबरी पार्क, चव्हाणनगर आदी भागाचा समावेश होतो. या मतदारसंघात व्यापारी व झोपडपट्टीचा सर्वाधिक भाग येतो. सर्वांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नाव शोधून स्लिप प्राप्त करुन घेतले आणि मतदान केले.
सहकारनगर येथील कामगार कल्याण मंडळ येथील मतदान केंद्रात पाचच्या सुमारास मतदारांची गर्दी नियंत्रणाबाहेर होती, हे निदर्शनास आले. तसेच बिबवेवाडी, जनता वसाहत, सॅलीसबरी पार्क येथे सायंकाळी मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी सहा हजार युवा मतदारांची भर पडली आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा मतदानासाठी उत्साह दिसून आला.
वाॅर रुममधून नियंत्रण
महर्षीनगर येथील कटारिया हायस्कूल येथे पर्वती मतदारसंघाचे निवडणुकीचे मुख्य केंद्र आहे. याच ठिकाणी वेब काॅस्टिंगद्वारे पर्वती मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यात येत होती. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ज्या ठिकाणी गर्दी दिसून येत होती, तेथील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करुन गर्दी नियंत्रणात आणण्याचे सूचित केले जात होते. दुपारपर्यंत जवळपास २०० हून अधिक दूरध्वनी केल्याची माहिती पर्वती विधानसभा निवडणूक अधिकारी मनोज खैरनार यांनी दिली.





