Pune : धोकादायक पयर्टनस्थळी प्रवेश बंदी

पुणे – कुंडमळा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी धोकादायक पयर्टनस्थळी जाण्यास बंदी घालावी आणि पर्यटनस्थळाच्या रस्त्यावर दिशादर्शक फलके लावावेत असे आदेश दिले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करुन स्थळांची निश्चिती करावी. नागरिकांमध्ये जनजागृती करावी. पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या तथापि पाणी साचणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट करावे, असेही आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण संदीप गिल्ल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाडी डुडी म्हणाले की, मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले ४ पर्यटकांचा मृत्यू हे दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करावे.
तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावेत. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक पथकाची नियुक्ती करावी. महावितरणने वीजेचे खाब, रोहित्र, तारांची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सात दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट
आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जुने पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलांचे येत्या ७ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. धोकादायक पूल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घ्यावेत. कार्यवाही करतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची घ्या, असेही त्यांनी सांगितले.





