pune : भरपावसातही देखावे पाहण्यासाठी उत्साह
pune : आठवड्याभरापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मंगळवारी (दि. २२) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून दिलासा दिला.

ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
pune : आठवड्याभरापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मंगळवारी (दि. २२) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून दिलासा दिला. अचानक आलेल्या पावसाने गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.
सायंकाळी सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस आल्याने रस्त्यासह चौकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे वाहतूक मंदावली, तर अनेक नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी छत्री व रेनकोट घालून हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मंगळवारी पहाटे व दुपारी १२ वाजता उपनगरांत काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दुपारी चारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळी सहा वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली.
पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्ते जलमय होऊन मुख्य चौकांत पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावरील छोटे- मोठे व्यावसायिक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली.
देखावे पाहण्यासाठी दुपारीच बाहेर पडलेल्या नागरिकांना आडोसा घ्यावा लागला, तर सायंकाळी देखावे पाहण्यासाठी उपनगरात येणारे नागरिक छत्री व रेनकोट घेऊन बाहेर पडले.
शहराच्या मध्यवर्ती भागासह शिवाजीनगर, औंध, पाषाण, कोथरूड, वारजे, धायरी, खडकवासला, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, स्वारगेट, हडपसर, मगरपट्टा, विश्रांतवाडी, येरवडा, लोहगाव, बोपोडी परिसरात विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुरू होत्या.
मानाच्या गणपतींसमोर गर्दी
पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी विविध राज्यांसह परदेशातूनही गणेशभक्त येतात. आज देखावे पाहण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे, त्यामुळे दुपारपासूनच मानाच्या गणपती मंडळांसमोर भाविकांनी गर्दी केली आहे.
मात्र, सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने भाविकांची धांदल उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू राहिल्याने अखेर गणेशभक्तांनी छत्र्या आणि रेनकोट घेऊन उत्साहाने देखावे पाहण्यासाठी हजेरी लावली.





