Vidyanand Bapat : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का? ‘त्या’ एका पोस्टने चर्चांना उधाण
Vidyanand Bapat : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Vidyanand Bapat : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. मात्र आता वकील असीम सरोदे यांच्या एका पोस्टमुळे या निवडणुकीसाठी डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करुन विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? असा प्रश्न विचारला आहे.
माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही.
ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे.
तर – – -… pic.twitter.com/HDlXMat1Ks
— Asim Sarode (@AsimSarode) September 22, 2026
असीम सरोदे यांची पोस्ट
असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षस विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे.
तर विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?” असा सवाल असीम सरोदे यांनी केला आहे.
दरम्यान, विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकतील डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला. पण त्यामुळे महाराष्ट्रात डीजे दणदणाटाविरुद्ध जागरुकता निर्माण झाली. दुसरीकडे विद्यानंद बापट यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्व देखील चर्चेचा विषय बनलं आहे. त्यांच्या मराठी भाषेचे अनेकांकडून कौतुकही झाले. परंतु याचदरम्यान आता विद्यानंद बापट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:
Pune District : वाल्हे परिसरात उसावर पायरिला तुडतुड्यांचे संकट





