Pune : हरित पुण्यासाठी अभियंते पालक; पालिका मुख्य ३२ रस्त्यांवर वृक्षारोपण करणार

पुणे : रस्ता रुंदीकरणावेळी झाडे काढल्याने शहराचे हरित आच्छादन कमी होते. त्यामुळे काढलेल्या झाडांचे एकतर पुनर्रोपण केले जाते किंवा तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली जातात. नव्याने लावलेल्या झाडांची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांचे पालकत्व अभियंत्याकडे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराचे हरित आच्छादन वाढावे किंवा आहे ते प्रमाण कायम राहवे यासाठी पालिका शहरातील मुख्य ३२ रस्त्यांवर झाडे लावणारआहे. पहिल्या टप्प्यात १५ रस्त्यांवर ३७०० झाडे लावण्यात येणार आहेत.
रस्ता रुंदीकरणात झाडे काढली तर शहराच्या हरित आच्छादनात घट होते, पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे एकतर काढलेल्या झाडांचे पुनर्रोपण केले जाते किंवा नवीन झाडांची लागवड केली जाते. नव्या झाडांची योग्य देखभाल होत नसल्याने याचे पालकत्व पालिका आता अभियंत्याकडे देणार आहे. नव्याने लावली जाणारी झाडे पाच-सहा वर्षे वाढ झालेली आहेत. या झाडांसाठी पालिका जवळच्या एसटीपी केंद्रातील शुध्द सांडपाणी वापरणार आहे.
धारीवाल फाऊंडेशनकडून सर्वाधिक झाडे
यासाठी पालिकेने ३२ रस्त्यांना प्राधान्य दिले असून झाडांच्या देकभालीची अभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. अभियंत्यांनी दिलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यानुसार, संबधित रस्त्यावर किती झाडे लावता येतील याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १५ रस्त्यांवर ३७०० झाडे लावणे शक्य असल्याचा अहवाल अभियंत्यांनी सादर केला. या उपक्रमासाठी झाडे दान करण्याच्या पालिकेच्या आवाहनानुसार आतापर्यंत सर्वाधिक झाडे रसिकलाल धारीवाल फाऊंडेशनने दिली आहेत. इतर संस्थांनीही झाडे देण्यास तयारी दर्शविल्याचे पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले.
येथे लावणार झाडे
नगररस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ ( व्हीआयपी रस्ता), कर्वे रस्ता, पौडरस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नाॅर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, पुणे – सासवड रस्ता, बायपास रस्ता, जुना विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, जुना मुंबई- पुणे महामार्ग, सेनापती बापट रस्ता, फर्गुसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, महात्मा गांधी रस्ता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, बंडगार्डन रस्ता, प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, टिळक रस्ता.





