Pune: एलरो आणि युनिकॉर्नचे प्रकरण येरवडा पोलिसांच्या अंगलट येणार? अमितेश कुमार यांनी दिले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

पुणे – पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, नाईट राऊंड अधिकारी यांना कल्याणीनगर येथील एलरो आणि युनिकॉर्न हे पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे कसे निदर्शनास आले नाही? स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळते, मग त्यांना का मिळत नाही? हा मोठा सवाल आहे. आम्ही सुरुवातीपासूनच स्पष्ट शब्दात सांगितले आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. हॉटेल, पब चालकांना नियमात काम करावे लागेल. असे असताना देखील जर स्थानिक पोलिस ठाण्याचे लोकं त्यांच्यावर मेहरबानी दाखवत असतील तर त्यांची खैर केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे, एलोरा आणि युनिकॉर्नचे प्रकरण येरवडा पोलिसांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे दिसून येते. याप्रकरणी, संबंधीत अधिकारी, कर्मचार्यांची चौकशीचे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी बुधवारी (दि.10) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
अमितेश कुमार म्हणाले की, हा प्रकार आम्ही गांभिर्याने घेतला आहे. तयार करण्यात आलेल्या नियमावलींचे उंल्लघन करून काही हॉटेल, पबवाले पहाटे पर्यंत धांगधींगा सुरु ठेवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिस ठाण्यांना दिले आहेत. मात्र त्यानंतर देखील स्थानिक पोलिस ठाणे त्यांच्यावर मेहरबानी दाखवत असल्याचे दिसते.
नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात. त्यांच्या निदर्शनास असे प्रकार येतात. मग स्थानिक पोलिसांना हे का दिसत नाही. त्यामुळे आता त्यांची जिम्मेदारी ठरवावी लागेल, असे म्हणत पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे. यापुढे आदेशानंतर देखील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आले, हॉटेल पब पाहटे पर्यंत डिजेच्या तालावर मद्यधुंद रात्र जागविताना दिसून आले तर त्याची धग पोलिस ठाण्याच्या प्रभारींना देखील बसणार हे मात्र नक्की आहे.
ही बातमी वाचा – Pune Crime: एलरो आणि युनिकॉर्न हाऊस पबला पोलिसांचा दणका; दोन्ही पब सिल, 29 लाखांची सामग्री जप्त





