PUNE: निवडणूक कर्मचाऱ्यांनी जबाबदारी चोख बजवावी; जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या सूचना

पुणे – निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी नियमानुसार आणि चोखपणे बजवावी. निवडणुकीदरम्यान चुकीच्या पद्धतीने मतदान होणार नाही याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात नव मतदारांची नोंदणी झाली आहे. पोस्ट कार्यालयाकडून पोस्टाने मतदान ओळखपत्र पाठविण्यात येते.
पाठवलेले मतदान ओळखपत्र मतदारांना भेटणे आवश्यक असून ते परत येता कामा नये. ५ जानेवारी २०२४ ला मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मतदार यादीची पडताळणी करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम अत्यंत महत्त्वाचे असून आचारसंहितेचे पालन करण्याची मोठी जबाबदारी या कालावधीत पार पाडावी लागते. यासाठी निवडणूक आयोगाचे कायदे आणि मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जारी केलेल्या नियम पुस्तिका आणि परिपत्रकांचे काळजीपूर्वक वाचन करुन नियमांची नीटपणे अंमलबजावणी करावी. आयोगाच्या निर्देशांची सातत्याने माहिती घेऊन त्यांचा अभ्यास करावा. निवडणुकीच्या कामात कोणतीही चूक अपेक्षित नाही. निवडणुकीच्या कामात दस्तऐवजीकरण खूप महत्त्वाचे असून त्याचे काम प्राधान्याने आणि गांभीर्याने करावे.
वारंवार होणाऱ्या चुका टाळा
भारत निवडणूक आयोगाच्या हस्त पुस्तिकांमध्ये ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यापैकी काय करू नये याची जाणीवपूर्वक वारंवार उजळणी करावी. यापुर्वी चुकीच्या घटना घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांची प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी. मतदार यादीतील १०० वर्षाच्या पुढच्या प्रत्येक मतदाराची पडताळणी करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.





