Pune : आंदेकरची आठ पक्की शौचालयेही जमिनदोस्त;महापालिका–पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

पुणे : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने उभारलेली आठ पक्की शौचालये, पत्राशेड व इतर अनधिकृत बांधकामे अखेर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने जमीनदोस्त केली. मंगळवारी सकाळी कडक बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही सर्व बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. पोलिसांनी कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा तैनात ठेवली.
कायदेशीर संदर्भ
आंदेकरविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांच्या आर्थिक मुळांवर घाव घालण्याची रणनीती म्हणूनच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा कारवाया गुन्हेगारीविरोधी मोहिमेचा भाग असल्याचे आयुक्तालयाने सांगितले.
स्थानिकांचा प्रतिसाद
या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. आंदेकर टोळीच्या दबदब्यामुळे नागरिक वर्षानुवर्षे दडपणाखाली राहत होते. “शेवटी प्रशासनाने ठोस पाऊल उचलले, हे आम्हाला धीर देणारे आहे,” अशी प्रतिक्रिया परिसरातील एका रहिवाशाने दिली. व्यापाऱ्यांनीही पोलिस व पालिकेचे आभार मानत पुढेही अशा गुन्हेगारांच्या बेकायदेशीर धंद्यांवर हातोडा चालवावा, अशी मागणी केली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ एकचे उपायुक्त कृषीकेश रावले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या उपस्थितीत पार पडली. “गुन्हेगारांना समाजात दहशत माजवू देणार नाही. आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर त्यांना धक्का दिला जाईल,” असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





