क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त आले अडचणीत पुणे- महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांकडे अधिकार, तसेच कामासाठी पुरेसा निधी नसल्याची तक्रार करणारे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त चांगलेच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. आयुक्तांनी अधिकार आणि निधी वाढविल्यानंतरही त्याचा वापर न करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना दणका बसण्याची शक्यता आहे. स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्ते व सांडपाणी यांसारख्या पायाभूत सुविधा सुधारणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आयुक्तांना पाहणीत आढळले. त्यामुळे आयुक्त त्यांची थेट बदलीच करत आहेत. कामात गंभीर चुका होत असल्यास थेट निलंबनाची कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला असून, त्याची सुरुवातही केली आहे. त्यामुळे असे अधिकारी आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिका प्रशासकांच्या ताब्यात आहे. नगरसेवक नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण कमी झाले आहे. नागरिक किंवा राजकीय पदाधिकारी समस्या घेऊन गेले, तरी कामे होत नसल्याची तक्रार येत आहे. काही अधिकारी कामावर उशिरा येणे, कार्यालयातून लवकर निघून जाणे यासारख्या प्रकारांत गुंतले आहेत. त्याचा परिणाम थेट शहराच्या कामकाजावर होत आहे. त्यातच क्षेत्रीय कार्यालयांकडून तक्रारीचे निवारण होत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे येत आहेत. आयुक्तांनी सूचना देऊनही अशा तक्रारी वांरवार येत असून, त्यात प्रभाग स्तरावर पडलेला कचरा, रस्त्यांवरील अस्वच्छता, खराब सांडपाणी वाहिन्यांची, गल्ली-बोळातील रस्त्यांची तातडीची दुरुस्ती,अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्स आदी तक्रारींचा समावेश आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी आता आयुक्तांनीच पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या वेळी समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आयुक्त देत आहेत. चार दिवसांत १२ जणांवर कारवाई आयुक्तांनी वाघोली, मांजरी, शेवाळवाडी, वडारवाडी आणि जनवाडी क्षेत्राची पाहणी केली असता अस्वच्छता, रस्त्यावर वाहते सांडपाणी, पडलेला कचरा यांसह स्थानिक नागरिकांचा रोषही पाहिला. त्यानंतर नगर रस्ता- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह दोन अभियंत्यांची बदली, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची बदली, तसेच शाखा अभियंता, आरोग्य निरीक्षक, मुकादमांचे निलंबन केले. घोले रस्ता- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली.