Pune : लक्ष्मीच्या आगमनाने पुणे लखलखले!

बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी केली सहकुटुंब पारंपारिक पद्धतीने पूजा, आतषबाजीने नभांगण उजळले
पुणे – दारावर झेंडुची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण, उंबऱ्याशी सुरेख रंग भरलेली रांगोळी, पणत्यांचा लखलखाट, पारंपरिक पेहराव अशा थाटमाटासह लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त घरोघरी मंगळवारी साजरा झाला. यानिमित्ताने शहरात आनंदाचे वातावरण तर होतेच, परंतु रात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.
यंदाचे हे प्रकाशपर्व संपूर्णपणे वेगवेगळे दिवस घेऊन आले आहे. प्रत्येक दिवस स्वतंत्रपणे आल्याने दिवाळीचा उत्साह सहाही दिवस चालणारा आहे. त्यातील चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. व्यापारी पेढ्या, आस्थापने, मंदिरे, सोसायट्या, इमारती, रस्ते प्रकाशाने उजळले आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. श्रीगणेशाच्या पूजेने सुरूवात करून कुबेरपूजेने या लक्ष्मीपूजनाची समाप्ती केली जाते.
लक्ष्मी रस्ता हा या दिवशी खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असलेले ठिकाण वाटते. प्रत्येक दुकानांमध्ये दुकानदार सहकुटुंब येऊन पूजा केली. कर्मचारीवर्गही नवे वस्त्र परिधान करून यात सहभागी झाला होता. या दिवशी वह्यांवर, हिशेबाच्या चोपड्यांवर स्वस्तिक काढून, त्यावर श्री लिहून लक्ष्मीची आराधना करण्यात आली ऊस, हळद-कुंकू, खारीक, खोबरे, बदाम, सुपारी पूजेला ठेवून आणि लाह्या, बत्तासे, पेढे याचा नैवेद्य दाखवण्यात आला. सुख समृद्धी याबरोबरच धनसंपत्तीही लाभो अशी प्रार्थना लक्ष्मीकडे करण्यात आली.
दुपारपासून आकाश ढगाळलेले असल्याने पावसाचे सावट होते. याशिवाय उकाडाही प्रचंड होता. त्यामुळे लक्ष्मीपूजनावेळी पाऊस येईल की काय अशी स्थिती होती. मात्र वरुणराजाने कृपा केली आणि पावसाने दडी मारली. त्यामुळे लक्ष्मीपूजन विनासायास झाले.





