Pune: मद्यधुंद चालकाची कार सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडकली

पुणे – मद्यधुंद कार चालकाची भरधाव कार कर्तव्यावर जात असलेल्या महिला सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडकली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील महात्मा गांधी चौकात घडली. या कारचालकाकडे वाहन परवानाही नसल्याचे आढळले आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई मनोजकुमार तुकाराम सोने यांनी दिलेल्या तक्रारीनूसार प्रफुल्ल भरत वाडे (३२, रा.विश्रांतवाडी) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त (खडकी) अनुजा देशमाने आणि त्यांचे दोन कर्मचारी येरवड्याहून खडकीच्या दिशेने वाहनातून जात होते. तेव्हा बंड गार्डन पूल परिसरात अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, कार चालक मद्यधुंद अवस्थेत त्याची कार चालवत होता. त्याने त्याच्या कारला ब्रेक लावला नाही आणि त्याने मागून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्याने पोलिसांशीच हुज्जत घातली. तो एका खासगी कंपनीत काम करतो. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार आव्हाळे करत आहेत.





