Pune : प्रेक्षक नव्हे सांस्कृतिक भवनात मद्यपी बसतात; वानवडी येथील स्थिती

वानवडी – येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन स्वच्छतेविषयी महापालिकेने निविदा काढलेल्या नाहीत. त्यामुळे या सांस्कृतिक भवनाची मोठी दुरवस्था झाली आहे. या परिसरातील टवाळखोर भिंतीवरून उड्या मारून मागील बाजूने आत येतात, मद्यप्राशन करीत बसतात. सुरक्षारक्षकांनी हटकल्यास त्यांना दमदाटी केली जाते. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे महापालिकेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष आहे.
महात्मा फुले सांस्कृतीक भवनात शालेय, राजकीय, मनोरंजन असे विविध कार्यक्रम दररोज होतात. बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या या संस्कृतीक भवनाला पालिकेच्या अपूर्ण व प्रतीक्षेत असलेल्या टेंडर प्रक्रियेमुळे विविध समस्यांनी घेरले आहे.
वानवडीतील प्रशस्त महात्मा फुले सांस्कृतिक भवन हे मागील दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. नाट्य प्रयोगांअभावी कलाकारांच्या राहण्यासाठी असलेल्या खोल्या धूळखात पडून आहेत, तसेच या खोल्यांमधील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
याठिकाणी तुटलेले दरवाजे, कडी-कोयंडे, आसन व्यवस्थेच्या खुर्च्या तुटलेल्या-फाटलेल्या अवस्थेत आहेत. विद्युत व्यवस्थेमध्ये बिघाड झाला आहे. स्टेजवर सोडल्या जाणाऱ्या लाइट बंद आहेत. पिण्यासाठी पाणी याठिकाणी नाही. सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था आहे. परंतु, पार्किंगमध्ये पुरेशी लाइट नाही. बाहेरील वाहने या ठिकाणी महिनोंमहिने उभी असतात.





