शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी प्रभागातून लढणार पुणे – भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी मंगळवारी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. प्रभाग क्रमांक १२ ड (शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी) या सर्वसाधारण गटातून त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवित आहेत. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. डॉ. एकबोटे यांनी यापूर्वी युवा मोर्चाच्या माध्यमातून पुण्यात अनेक सामाजिक आणि रचनात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, त्यांच्या मातोश्री डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे त्यांना या भागातील संपूर्ण माहिती आहे. डॉ. एकबोटे म्हणाल्या की, माझे बालपण याच प्रभागात गेले आहे, त्यामुळे येथील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. इथल्या पायाभूत सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असेही त्यांनी सांगितले.