Pune District : अत्याचारप्रकरणी तरूणाला कारावास

लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीच्या घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला न्यायालयाने एकूण १६ वर्षे सक्त कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती के डी शिरभाते यांनी हि शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी नवनाथ अशोक खराडे (वय २६, उरुळी कांचन, तुपे वस्ती, मूळ गाव भोगेवाडी, जि. सोलापूर) याला शिक्षा सुनावली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. ही घटना (दि.३) डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी केला होता. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. नवनाथ खराडे याला विनयभंगप्रकरणी १ वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड, विनापरवाना घरात घुसल्या प्रकरणी ५ वर्षे सक्त कारावास व १० हजार रुपये दंड व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अन्वये १० वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
तिन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. एकूण ८ साक्षीदार तपासले. प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे यांनी काम पाहिले.





