पुणे जिल्हा : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी शहांबरोबर

गजानन गवळी यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका केली स्पष्ट
इंदापूर – इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी आम्ही मनापासून विधानसभा निवडणुकीत काम केले.लोकसभेला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले होते. तब्बल 10 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले, नगरसेवक होतो, गटनेता झालो. या पक्षाचे उपकार विसरू शकत नाही; परंतु काही कारणास्तव आता इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या बरोबर जाण्याचे ठरवले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर नगरपरिषदेचे माजी गटनेते गजानन गवळी यांनी दिली.
गजानन गवळी यांनी रविवारी (दि. 24) घेतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, भरत शहा ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत काम केले जाईल. इंदापूर शहराच्या काहीही अडचणी असतात. त्यावेळेस मनमोकळेपणाने, नागरिकांच्या, जनतेच्या, समस्या सोडवण्यासाठी, अडचणी राहणार नाहीत असे मला वाटते. इंदापूर शहरातील कार्यकर्त्यांचा ओढा जास्त, युवक, नागरिक तसेच सर्व घटकातील कार्यकर्ते भरत शहा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा त्यांनी व्यक्त केला.
शहा कुटुंबीय जिकडे,तिकडे मी काम करणारच
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत शहा कुटुंबीय जरी एखाद्या राजकीय पक्षात गेले तरी शहा कुटुंबीय जिकडे असतील तिकडे मी काम करणारच. नगरपरिषदेला मी निवडणुकीला उभा राहणार का ? नाही याबद्दल त्यावेळेस निर्णय जाहीर करेन, असेे गजानन गवळी यांनी स्पष्ट केले.





