Chirag Paswan : उत्तरप्रदेशात लढणार चिराग यांचा पक्ष; निवडणुकीला स्वतंत्रपणे जाणार सामोरा
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अर्थात लोजप (आरव्ही) बिहारबाहेर विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Chirag Paswan – केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अर्थात लोजप (आरव्ही) बिहारबाहेर विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्या पक्षाने उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या सर्व ४०३ जागा लढवण्याची तयारी लोजप (आरव्ही) ने चालवली आहे. त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चिराग लवकरच उत्तरप्रदेशचा दौरा करणार आहेत. लोजप (आरव्ही) केंद्रात आणि बिहारमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा (एनडीए) भाग आहे.
मात्र, उत्तरप्रदेशात तो पक्ष एनडीएचा भाग बनणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या राज्यात पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशातून लोजप (आरव्ही) आगामी निवडणुकीला सामोरा जाणार आहे. चिराग यांच्या पक्षाचा उत्तरप्रदेशात किती प्रभाव पडणार ते आगामी निवडणुकीनंतरच समोर येईल.
मात्र, लोजप (आरव्ही) मुळे उत्तरप्रदेशच्या मैदानात आधीच भाऊगर्दी असलेल्या राजकीय पक्षांच्या संख्येत भर पडेल. तो पक्ष उत्तरप्रदेशातील सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवणार की विरोधकांच्या मतांमध्ये विभाजन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






