Pune District : जानाई शिरसाईचा फायदा कोणाला?

दिवे : राज्य शासनाने पुरंदर, दौंड आणि बारामती तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी तयार केलेल्या जानाई शिरसाई योजनेसाठी नुकतेच 438 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून योजनेतील वितरीकांना बंद पाइपलाइनमधून पाणी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे; परंतु योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत पुरंदरच्या वाट्याला अपेक्षित पाणी मिळालेच नाही. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे धरणातून पाणी सोडले जाते खरे, मात्र पुरंदरच्या शेतकर्यांना पाण्याचा लाभच मिळत नसेल आणि दुष्काळाला कायमच तोंड द्यावे लागत असेल तर या योजनेचा फायदा कोणासाठी, हा प्रश्न आता पुरंदरचे शेतकरी उपस्थित करीत आहेत.
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही धरण साखळी शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी उभारण्यात आली होती. मात्र मागील 10 वर्षांत योजनेला खडकवासला धरणातून कधीच पाऊण टीएमसीपेक्षा अधिक पाणी उपलब्ध झालेले नाही. जानाई शिरसाई उपसा ही सिंचन योजना खडकवासला धरण साखळीतून मंजूर असलेल्या 4 टीएमसी पाण्यावर अवलंबून आहे. तर खडकवासला धरणातून पुणे शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.पुणे शहराची दिवसेंदिवस होणारी बेसुमार वाढ पाहता भविष्यात जानाई शिरसाई योजनेला पाणी मिळणे आणखी दुरापास्त होणार आहे.
जसजशी पुण्याची वाढ होत गेली तसा शेतीला मिळणारा पाण्याचा साठा कमी कमी होत गेला. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांची पाणीसाठा क्षमता 29 टीएमसी आहे. पुण्याला 11.5 टीएमसी पाणी पिण्यास मंजूर आहे; मात्र सध्या पुण्याला 20.78 टीएमसी पाणी दिले जाते. याशिवाय पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होते. त्यात आता महापालिकेने आपली हद्दवाढ करून 34 गावे नव्याने महापालिकेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. याचा अर्थ भविष्यात शेतीला दिल्या जाणार्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर गंडांतर येणार हे निश्चित.
11.5 टीएमसी पाणी देण्याचा मात्र…
जानाई शिरसाई योजनेला दिवसेंदिवस पाणी कमी होणार हे सरळसरळ आहे. त्यामुळे पाणीच नसताना 438 कोटींची पाइपलाइन कशाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पुणे शहराला खडकवासला धरणातून केवळ 11.5 टीएमसी एवढे पाणी देण्याचा पाणी वाटप लवादाचा निर्णय आहे. मात्र मागील काही वर्षांचा अनुभव पाहता कित्येक पटींनी पाणी घेतले जात आहे.
वर्ष*** पुण्यासाठी उचलले पाणी (टीएमसीमध्ये)
2015***16. 50
2016***16.71
2017 ***18.71
2024***20.78
मग शेतीला कधी पाणी मिळणार
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातील पाणीसाठा क्षमता 29 टीएमसी असून यापैकी तब्बल 21 टीएमसी केवळ पुण्याला पिण्यासाठी दिले जाते. तसेच पुढील दहा वर्षांचा विचार केल्यास लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढणार असून संपूर्ण 29 टीएमसी पाणी पुण्यालाच लागणार आहे. मग शेतीला कधी पाणी मिळणार ?
वीर धरणातील पाण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ,,,,,
गुंजवणी, भाटघर, वीर नदीतून नीरा नदीत पाणी वाहत जाते. तर नीरा नदीतून दरवर्षी तब्बल 100 टीएमसी पाणी कर्नाटकमध्ये जाते. मात्र याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याऐवजी तेच पाणी उचलून जेजुरीच्या नाझरे धरणात सोडल्यास तेथून पुरंदरच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांसह बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाला देणे शक्य आहे. त्यातून परिसरात मोठमोठे बंधारे बांधता येईल आणि बंधारे, तलाव मधून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचाही कायमचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने जानाई शिरसाई योजनेसाठी मंजूर केलेले 438 कोटी नीरा नदीवरील प्रकल्पासाठी द्यावेत.
…तर योजनांवर कोट्यवधींची खैरात कोणासाठी ?
औद्योगिकीरण सर्वत्र झपाट्याने वाढत असून पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पुरंदर आणि परिसरात मोठमोठ्या कंपन्या निर्माण होणार असल्याने त्या दृष्टीने उद्योगाला पाणी द्यावे लागणार. मग संपूर्ण पाणी पिण्यास आणि उद्योगाला दिल्यास शेतीसाठी पाणी कोठून आणणार? मग शेतीलाच पाणी शिल्लक राहणार नसेल तर योजनांवर कोट्यवधीं रुपयांची खैरात कोणासाठी ?





