Pune District : वरंधा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

चार महिने मार्ग निर्बंध ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
हिरडस मावळ – राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डी डी हा राजेवाडी ते वरंधा भोर महाड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या सूचनेनुसार हा रस्ता १७ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी डी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पुण्याहून महाडकडे जाणारा हा रस्ता जवळचा असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतूक जास्त असते. तसेच या मार्गावर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन दरडी कोसळण्याच्या घटना होऊ शकतात. तसेच या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरडी कोसळून अनर्थ घडला जाऊ नये म्हणून हा रस्ता अवजड तसेच इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी भोर,उपविभाग भोर यांनी तहसीलदार भोर व पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन यांच्याकडून अहवाल मागवला या अहवालानुसार सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. हे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र आहे. तसेच सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून भोर महाड मार्गावर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळण्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी भोर महाड मार्गावरील वरंधा घाट रस्ता ३१ सप्टेंबरपर्यंत चार महिने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करणेबाबत नमूद केले आहे.
तसेच या कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीबाबतचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट दिल्यास त्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस वरंधा घाट रस्ता बंद करण्यात यावा. तसेच नमूद कालावधीत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट न दिल्यास सदरचा घाट रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला राहील.पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी प्रवाशांनी पुण्याहून कोकणाकडे जाण्यासाठी तसेच कोकणातून पुण्याला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असाही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.





