Pune District : जुन्नरच्या आदिवासी युवकाने सर केले माउंट किलीमांजारो

लेण्याद्री : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर – माउंट किलीमांजारो (5895 मी.) यशस्वीपणे सर करण्याचा मान तळेरानच्या (ता. जुन्नर) निखील किसन कोकाटे या आदिवासी युवकाने मिळवला आहे. त्याने 19 फेब्रुवारी, शिवजयंतीदिनी हा ऐतिहासिक पराक्रम केला.
या अनोख्या मोहिमेसाठी आदिवासी प्रकल्प विभागाने मोलाची मदत केली होती. या मोहिमेची सुरुवात निखिलने किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन 12 फेब्रुवारी रोजी सुरू केली. त्यानंतर तो विमानाने किलीमांजारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्यानंतर सात दिवसांच्या ट्रेकमध्ये कॅनडा, स्लोव्हेनिया, फ्रान्स, हाँगकाँग आणि इंग्लंड, रशिया येथील गिर्यारोहक सहभागी होते.
स्थानिक पारंपरिक पोशाखात सन्मानित करून या ट्रेकचा शुभारंभ झाला. मचामे गेटपासून सुरू झालेला ट्रेक मवेका गेटपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला. दरम्यान, या मोहिमेच्या विविध टप्प्यावर युवकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. अत्यंत थंड हवामान, कमी ऑक्सिजन, डोंगराळ भागातील अवघड वाटा यावर मात करत प्रवास सुरू राहिला.
18 फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजता अखेरच्या चढाईस सुरुवात झाली. तब्बल 6 तासांच्या कठीण चढाईनंतर, 5780 मी. उंचीवरील स्टेला पॉइंट गाठल्यावर गिर्यारोहकांचा आत्मविश्वास वाढला. शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिद्दीने पुढे जात 19 फेब्रुवारीच्या सकाळी आफ्रिका खंडातील (टांझानिया) सर्वोच्च शिखर सर केले. हा मोहिमेचा पहिला टप्पा असून, आगामी पर्वतमोहिमा सुरू करणार असल्याचे निखिलने सांगितले.





