Pune District : ऊस तोडणीसाठी सध्या हार्वेस्टरचा वापर वाढला

लाखणगाव : ऊस तोडणी करण्यासाठी सध्या हार्वेस्टरचा वापर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उस तोडणीच्या कामासाठी वाढला आहे. हार्वेस्टरच्या साहाय्याने चांगल्या प्रकारची व कमी वेळात चांगली ऊस तोडणी होत आहे. हार्वेस्टरच्या साह्याने ऊस तोडणीला पसंती वाढली असल्याची माहिती भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील आणि उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरू असून कारखान्याच्या माध्यमातून मजुरांच्या साहाय्याने ऊस तोडणी केली जाते. त्याचप्रमाणे हार्वेस्टरच्या साह्याने ऊस तोडणी केली जात आहे. सध्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून १३ हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी केली जात आहे. हार्वेस्टरच्या साह्याने कमी वेळात चांगल्या पद्धतीने ऊस तोडणी होत असल्याने शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होत नसल्याने मजुरांच्या सहाय्याने ऊस तोडणी करण्यापेक्षा हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊस तोडणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून १३ हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी होत आहे. एक मशीन एका दिवसाला १०० टनापर्यंत ऊस तोडणी करते.
त्यामुळे कमीत कमी दीड एकर उसाची तोडणी हार्वेस्टर मशीन एका दिवसाला करते.त्याचप्रमाणे एका मशींनच्या सोबत सहा ते सात वाहने काम करतात. यामध्ये शेतातून रस्त्यापर्यंत तोडलेल्या उसाची वाहतूक करणे, दोन ईनफिडर व तेथून कारखान्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर कामासाठी, अशा पद्धतीने सहा ते सात वाहने एक मशीनच्या सोबत काम करत आहेत. उन वाढू लागल्याने शेतातील ऊस लवकर तुटून जावा. यासाठी सर्व शेतकरी प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळेच ऊस तोडणीच्या कामांना वेग आला असून ऊस लवकर तुटावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आणि मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी दिली.
हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी करत असताना शेत कोरडे हवे असते. जेणेकरून हार्वेस्टरची चाके शेतात रुतणार नाहीत. त्याचप्रमाणे हार्वेस्टरच्या साह्याने ऊस तोडणी ही जमिनीलगत होत असते. तसेच पडलेला ऊसही हार्वेस्टर मशीन उचलून घेत असल्याने मजुरांच्या साहाय्याने ऊस तोडताना अनेक वेळा उस जाळावा लागतो. तो प्रकार होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो.तसेच ऊस तोडणी केल्यानंतर राहिलेल्या पालापाचोळ्याची बारीक कुट्टा शेतात पसरली जाते. त्याचाही खत म्हणून उस वाढवण्यासाठी फायदा होतो. या पाचट कुट्टीमुळे उन्हाळ्यात कमी पाणी लागते,अशी माहिती भीमाशंकर साखर कारखान्याचे पारगाव गट प्रमुख किरण गरुड आणि पारगाव गटाचे शेतकी मदतनीस रोहिदास पऱ्हाड यांनी दिली.
हार्वेस्टरच्या वापराचे अनेक फायदे…
ऊस जमिनीलगत एकसारखा तोडल्यामुळे त्याच्यातून फुटवा हा चांगला होतो.कोयत्याने तोडलेल्या उसापेक्षा हार्वेस्टरने तोडलेल्या उसाचा खोडवा हा सरासरी एका एकराला दहा टनांपर्यंत अधिकचे उत्पन्न देतो. असे अनेक फायदे हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊस तोडणीमुळे होत असून त्यामुळे हार्वेस्टरला शेतकऱ्यांची पसंती वाढू लागली आहे, अशी माहिती भीमाशंकर साखर कारखान्यांचे मुख्य उस अधिकारी दिनकर आदक आणि सोमेश्वर दीक्षित यांनी दिली.





