बारामतीतील शिक्षकाला दीड लाखांचा फटका! बारामती – सोशल मीडियावरील ‘अनोळखी मैत्री’ घातक ठरू शकते. बारामतीतील एका शिक्षकाला अशाच सायबर सापळ्यात अडकवून आरोपींनी दीड लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मे २५ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान आरोपींनी एका महिलेमार्फत शिक्षकाला संपर्क साधला. सुरुवातीला आकर्षित करण्यासाठी अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला. नंतर “नग्न होऊन स्वतःचा व्हिडिओ दाखव” अशी मागणी झाली. नकार दिल्यास “व्हिडिओ व्हायरल करू, वरिष्ठांकडे तक्रार करून नोकरी घालवू, पैसे नाही दिले तर जीव गमवावा लागेल” अशा धमक्या देण्यात आल्या. या भीतीच्या छायेत शिक्षकाकडून हप्त्यांमध्ये तब्बल १,१५,३५० रुपये उकळण्यात आले. त्यानंतरही आरोपींनी आणखी १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र शिक्षकाने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दिली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा. बर्गे वस्ती, आळंदी रोड, चाकण) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. कोकणे चौक, चाकण) या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. सायबर सतर्कता सूचना (पोलिसांचा इशारा) अनोळखी व्यक्तीकडून आलेले संदेश, कॉल किंवा व्हिडिओंवर कधीही विश्वास ठेवू नका. वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ कुणालाही पाठवू नका. धमक्यांना घाबरून पैसे देऊ नका. ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता व शहाणपण हाच खरा बचाव आहे.