Pune District : शाळेच्या विकासासाठी समाजातील दात्यांची भूमिका महत्त्वाची

लाखणगाव : शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक व गुणात्मक विकास करत असताना समाजातील दानशूर दात्यांची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा परिषद शाळेसाठी देणगीदारांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विविध गोष्टींचा उपयोग शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होईल, असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी व्यक्त केले.
काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आणि गावाच्या भौतिक विकासासाठी ग्रामस्थांनी वस्तूरुपी व रोख स्वरुपात आर्थिक देणगी दिली आहे. त्या दानशूरांचा सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब घुले बोलत होते.
यावेळी सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, रोहिदास तुळे, अशोक जोरी, सोसायटीचे अध्यक्ष कुंडलिक जोरी, शाळेचे अध्यक्ष राहुल भुरके, काळुराम टिंगरे,शंकर करंडे, मंगेश करंडे, देवस्थानचे उपाध्यक्ष नरहरी करंडे, रामदास करंडे,राजु जोरी,संतोष करंडे,किशोर करंडे,दत्तात्रय करंडे,नवनाथ करंडे,हनुमंत रणपिसे, संदीप करंडे, मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मागील चार वर्षांमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मदतीने ही सुधारणा करण्यात आली आहे.
गावातील अनेकदा ग्रामस्थांनी वस्तूरुपी व भौतिक सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी दिली आहे. देणगीदारांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष राहूल भुरके यांनी सांगितले. सुरेश भागवत यांनी प्रास्ताविक व नीलिमा वळसे पाटील व उत्तम वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. तर, आभार दिनेश तूळे यांनी मानले.





