पुणे जिल्हा : पोलीस व नागरिकांनी बुजवला खड्डा

शिक्रापुरात बांधकाम विभाग व प्रशासन निद्रिस्त
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर- चाकण रस्त्यावर मुख्य चौकातच भला मोठा खड्डा पडल्याने अनेक लहान, मोठे अपघात व खड्ड्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हा खड्डा बुजवला आहे.
शिक्रापूर येथील राज्य महामार्ग क्रमांक ५५ या शिक्रापूर चाकण रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ आहे. मुख्य चौकातच रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता. यापूर्वी अनेकदा खड्डा पडून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.
सध्या पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचून तो खड्डा दिसत नसल्याने अनेक वाहने खड्ड्यात आदळून अनेक अपघात होऊ लागल्याने पोलिसांनी उद्योजक सचिन खेडकर यांच्या माध्यमातून रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा बुजवला.
यावेळी पोलीस हवालदार अमोल दांडगे, मिलिंद देवरे, ज्ञानेदेव सोनवणे, मोहन पाटील उपस्थित होते. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असताना पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेने अनेक अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.





