पुणे जिल्हा : राजगड तालुक्यातील जनता प्रलोभनाला बळी पडणार नाही

– आ.संग्राम थोपटे; जनता आमच्याच पाठीशी
राजगड – राजगड तालुक्यातील जनता स्वाभिमानी असून ती कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी एक दिलाने काम करू, असे मत आ.संग्राम थोपटे यांनी तालुक्याच्या दौर्यावर असताना व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड तालुक्यातील पासली खोर्यातील विविध गावांना भेटी दिल्या. सकाळी मेंगाई देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भोर राजगड मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी गाव भेट दौर्यास सुरुवात केली.
पासली खोर्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्यासाठी भोर्डी – वरोती बंधारे बांधण्यात आल्यामुळे १८ गावांना बारमाही शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झाली. भोर्डी – शेवते रस्त्याचे काम पुढील वर्षात पूर्ण असेल. या रस्त्यामुळे पुणे- कोकण सर्वात कमी अंतराचा जवळचा रस्ता असल्याने प्रवाशांचा वेळ व खर्च वाचणार आहे. उद्योगाला चालना मिळणार आहे. अनेक रस्ते, पूल, सामाजिक सभागृह, शाळा इमारती, ग्रामपंचायत कार्यालय, प्रशासकीय इमारती, पोलीस स्टेशन इमारत, असे अनेक कामे या मागील काळात मार्गी लागली आहेत. काही सुरू असलेली कामे पुढील काळात पूर्ण होतील.
भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी एक सुवर्णसंधी यावेळी निर्माण झाली असून यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीच आहे आणि यापुढेही राहील, असेही आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कुंबळे ते चांदवणे हा रस्ता वनविभागाच्या हरकतीमुळे प्रलंबित आहे. परंतु शासन दरबारी याबाबत पाठपुरावा सुरू आहे. खिंड रस्ता पावसामुळे खराब झाला होता, त्याचे देखील काम सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. राजगड तालुक्यातील जनता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही.
यावेळी वेल्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासो राऊत, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, राजगड सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शोभा जाधव, संदीप नगीने, गणेश जागडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्याध्यक्ष रमेश शिंदे, शिवाजी चोरघे, गणपत आप्पा देवगिरीकर, शिवराज शेंडकर, निलेश पवार, प्रकाश बडे, सागर मळेकर, शंकर रेणुसे, विलास वालगुडे, नंदू घाटे विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.





