Pune District : ’थार’ गाडीसाठी माहेरहून पैसे आणण्याच्या तगादा

लोणी काळभोर : वैष्णवी हगवणेच्या आत्महतेचे प्रकरण ताजे असतानाच आता थार गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्याचा लावलेला तगादा, शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून उच्च शिक्षित विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका 26 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सौरभ सुनिल सातव (वय 29), सासू सविता सुनिल सातव, सासरे सुनिल शिवाजी सातव (सर्व रा. उरुळी देवाची, ता. हवेली), नणंद साक्षी प्रतिक बोराटे (रा. मोशी), पतीची मैत्रिण अपूर्वा रमेश कड, पतीची मावशी विद्या भूमकर व पतीचे काका अतिष भूमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता पुण्यातील एका शैक्षणिक संकुलात काम करीत आहेत. त्यांचा मागील पाच महिन्यांपूर्वी उरुळी देवाची येथील सौरभ सातव यांच्याशी विवाह झाला आहे. विवाहाच्या काही दिवसानंतर सौरभ सातवने विवाहितेला त्रास देण्यास सुरवात केली.
विवाहिता काम करीत असलेल्या शैक्षणिक संकुलातून त्यांना मागील काही महिन्यांपासून पगार झाला नव्हता. त्यामुळे घरात खूप मोठा वाद पेटला होता. कारण त्यांना नवीन थार गाडी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी विवाहितेला थार गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असा तगादा लावला. सौरभ सातव हा पिडीतेला मारहाण करून शिवीगाळ करीत होते. तसेच त्याने पिडीतेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. त्यामुळे विवाहितेला तिचे आईवडील माहेरी घेऊन आले होते.
या सासरकडील मंडळींकडून होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. माहेरी राहत असलेल्या घरी दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांना हा प्रकार समजल्यानंतर विवाहितेच्या आईवडिलांनी तिला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.
सुसाईड नोट
विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी 14 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये पतीसह सासरकडील सर्व मंडळींचे कारनामे लिहिले आहेत. सासरच्या मंडळींनी विवाहितेचे स्त्रीधन काढून घेतले आहे. विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून शिवीगाळ केली आहे. विवाहितेला नोकरीतून मिळणार्या पैशांवर सासरच्या मंडळींचा डोळा असल्याचे दिसून येत आहे.





