Pune District : एक वेगळे अधिवेशन केंद्र सरकारने घ्यावे

सासवड : केंद्र शासनाने बोलावलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीला आम्ही गेलो होतो त्यावेळी हा भारतावर हल्ला झाला म्हणून आम्ही सर्व सरकारबरोबर आहोत. पुढील दोन आठवडे आम्ही सरकारवर टीका करणार नाही. एक वेगळे अधिवेशन सरकारने घ्यावे. भारताची शांतता ऐक्य जपण्याचे ही सर्वांची जबाबदारी आहे. भारत सरकार काय निर्णय घेत आहेत याची आम्ही वाट पाहत आहोत. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या ताणावाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये विमानतळ प्रकल्पबाधित शेतकर्यांवर झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे बोलत होत्या. यावेळी शिष्टमंडळामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, पुष्कराज जाधव, मनीष हगवणे, कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड, चेतन मेमाणे, राजाभाऊ कुंभारकर, देविदास कामठे, महादेव टिळेकर, विजय गांजुरे, माऊली मेमाने, मुरलीधर झुरंगे, अमोल कामठे, तुषार झुरंगे उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या कुठल्याच विकासाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु विकास अशा ठिकाणी व्हावा ज्या ठिकाणी शेतकर्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प व्हावेत त्याचबरोबर शेवटच्या शेतकर्याचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येऊ नये. ही भूमिका आमची पहिल्यापासून आहे मग तो विमानतळ किंवा रिंग रोडचा प्रश्न असो कोणत्याही शेतकर्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे.
भूसंपादन अधिकारी यांनी शेतकर्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे यामध्ये कृती समिती स्थापन करून जो काही शेतकर्यांचा विरोध असेल किंवा आणखी काही पर्याय असतील ते सरकारला पोचवले जातील तोपर्यंत कुठलाही सर्व्हे करण्यात येऊ नये, असे सुळेंनी स्पष्ट केले.
त्यांना जामीन मिळेल
शेतकर्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांना आजच जामीन मिळेल अशा अपेक्षा आहे. यामध्ये कोणी दहशतवादी नाही हे सर्व पुरंदरची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावा. सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अतिशय संवेदनशील पणे घ्यावा. सर्व पुरंदरवासीय व कृती समिती ठरली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटणार आहोत
हे नेते शेतकर्यांसोबत
आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, यांना मी सकाळी फोन केला. सर्वांनी सांगितले आम्ही शेतकरी सोबत आहोत.
कृती समिती स्थापन करून चर्चा करणे गरजेचे
काही आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये पोलीस बसून योग्य तो निर्णय घेतील व येणार्या दोन-चार दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या संदर्भात विचार करतील.विमानतळाच्या प्रश्नासाठी पुरंदर वासीय म्हणून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. एक कृती समिती स्थापन करून सरकार बरोबर चर्चा करणे गरजेचे आहे.
कायदेशीर बाजु समजुन सांगितली आहे. शासनाशी सुसंवाद ठेवा कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका जे गुन्हे दाखल आहेत त्याबाबत वस्तूनिष्ठ माहिती शिष्टमंडळाला दिली आहे.
– पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक




