पुणे जिल्हा : लोणी देवकर एमआयडीसीत स्थानिकांना ठेंगा

स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार ः युवकांच्या मनात नैराश्याची लाट
लोणी देवकर – इंदापूर तालुक्यातील स्थानिक युवकांना रोजगार मेळावा या हेतूने लोणी देवकर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. यामध्ये अनेक लहान-मोठे उद्योग आले. येथील उद्योगांना अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र त्याचा मुख्य हेतू साध्य होताना दिसत नाही.
या ठिकाणी स्थानिक पात्र युवकांना रोजगार मिळत नाही. याउलट कमी मोबदल्यात परराज्यातील युवकांना लगेच नोकरी दिली जाते. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांची हेळसांड कंपनी व्यवस्थापनाकडून होत आहे. योग्य शिक्षण घेऊन पण येथे नोकरी मिळत नाही त्यामुळे येथील युवकांच्या मनात नैराश्याची सुप्त लाट निर्माण झाली आहे.
लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 30हून अधिक लहान-मोठे उद्योग सुरू आहेत. तसेच काही बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील आहेत; मात्र त्यामध्ये निम्म्याहून जास्त परराज्यातील युवक काम करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाला आहे. विशेष म्हणजे यामधील स्थानिक गावगुंडांना लहान मोठे ठेके देऊन त्यांची तोंडं बंद करून परराज्यातील युवकांना इथे कामावर ठेवले जाते. येथील स्थानिक युवक काम करत नाही भांडणे करतात अशी कारणे देत त्यांना कामावर ठेवले जात नाही अशी बाब समोर आली आहे.
आंदोलनाचा इशारा
शासनाचे धोरण स्थानिक युवकांना स्थानिक भागात रोजगार देण्याचे आहे; मात्र याला उद्योजक प्रतिसाद देत नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळेच येथील स्थानिक युवकांना रोजगारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित युवकांचा रोजगारा बद्दल ठोस पावले उचलली पाहिजेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गायकवाड यांनी दिला आहे.





