Pune District : चार जागांसाठी सात जण रिंगणात

ओझर: देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.जुन्नर/आंबेगाव च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट व ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गट यांच्यात निवडणूक होणार असून 4 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह 61 उमदेवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती; मात्र ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गटात उमेदवार रहेमान अब्बास मोमीन इनामदार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने ,
या गटातील 3 जागांसाठी इनामदार यांच्यासह संतोष बबन खैरे, सुधीर महादू खोकराळे, अध्यक्ष सत्यशील सोपान शेरकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तसेच इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात 1 जागेसाठी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून रहेमान अब्बास मोमीन इनामदार, निलेश नामदेव भुजबळ, सुरेश भिमाजी गडगे हे निवडणूक रिंगणात आहेत. मतदान शनिवारी (दि. 15) आणि मतमोजणी रविवारी (दि. 16) होणार आहे.





