Pune District: सासवड न्यायालयाची इमारत झाली जीर्ण

दिवे : पुरंदर तालुक्याचे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय असलेली सासवड येथील इमारत खूप जीर्ण झाली असून बदलत्या परिस्थितीत काम करण्यास अपुरी पडत आहे. बारमधील वकील संख्या वाढली असून काम करताना खूप अडचणी जाणवत आहेत.
यापूर्वी दिवाणी आणि फौजदारी असे दोनच न्यायाधीश होते. परंतु अनेक दिवसांपासून तीन न्यायाधीश न्यायदानाचे काम करीत असून त्यानाही प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व सुविधा असलेली सुसज्ज इमारतीचे बांधकाम करून द्यावे, असे साकडे सासवड बार असोशिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घालण्यात आले आहे.
सासवड बारचे अध्यक्ष अॅड. अविनाश भारंबे यांच्यासह ज्येेष्ठ विधिज्ञ अॅड. एल. एन. गायकवाड, अॅड. सचिन कुदळे, अॅड. सुनील कटके, अॅड. दिलीपराव निरगुडे, अॅड. मनोहर पवार आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
दरम्यान पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा ही काही दिवसांपूर्वीच बारच्या वतीने सत्कार करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच शिवतारे यांनीही जागेची उपलब्धता आणि इमारतीसाठी निधी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे अॅड. अविनाश भारंबे यांनी सांगितले आहे.
अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
बारच्या सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मिटिंग हॉल, न्यायाधीशां साठी स्वतंत्र कक्ष, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आवश्यक आहे. सध्या वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्यांना कामकाज करताना खूप अडचणी जाणवत आहेत. यासाठी भव्य आणि सुसज्ज इमारतीची आवश्यकता असून या बाबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या काही दिवसांत कामकाजाला वेग येईल असे अॅड. अविनाश भारंबे यांनी सांगितले आहे.





